दोषींवर गुन्हा दाखल होणार
मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या कर्जप्रकरणात सुमारे 512.54 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. कर्जघोटाळ्याप्रकरणी बॅंकेला झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी रायगड जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती करण्यात आली असून या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या व्यक्तिंवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सहकार मंत्री शामराव पाटील यांनी विधानसभेत दिली.
कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असून बॅंकेचे अध्यक्ष व व्यवस्थापनाने कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, आशिष शेलार, अमित साटम, मनिषा चौधरी यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सहकार मंत्री शामराव पाटील यांनी वरील माहिती दिली.
रिर्झव्ह बॅंकेच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मधील तरतुदीनुसार सदर बॅंकेचे विशेष लेखापरिक्षण करण्यात आले. लेखापरिक्षणाच्या अहवालानुसार 63 कर्जप्रकरणात 512.24 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी 17 कर्जप्रकरणांमधील 95.31 कोटी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा ऍकेडमी यांच्या बॅंक खात्यामध्ये वर्ग झाल्याचे अहवालावरून निदर्शनास आल्याचे उत्तरात नमूद केले आहे.
बॅंकच्या ठेवीदारांच्या तक्रारीनुसार त्यांच्या ठेवी तत्काळ देण्याबाबत सहकार आयुक्तांनी बॅंकेस आदेश दिले आहेत. तसेच बॅंकेच्या आर्थिक गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना पत्र दिले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे पाटील यांनी उत्तरात म्हटले आहे.