हडपसर (प्रतिनिधी) – “शहरातील पक्ष संघटनेचे आणखी बळकटीकरण करण्यासाठी संपूर्ण शहरात पुढील तीन महिन्यात 500 शाखा सुरू करण्याचा मानस असून, याची सुरुवात वानवडी प्रभागापासून केली आहे. सर्व वर्गातील महिला भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी एक हक्काचे व्यासपीठ या शाखेच्या निमित्ताने उभे राहणार आहे.
वानवडी प्रभागातील युवाशक्तीसाठी या शाखेच्या माध्यमातून समाजकारणाची दारे उघडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परिसरातील जास्तीत जास्त युवकांना सामावून घेत वानवडीमध्ये युवक संघटनेच्या सक्षमीकरणासाठी ही शाखा प्रमुख केंद्र बनेल ,असा विश्वास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
वानवडी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शाखेचा शुभारंभ रुबी हॉस्पिटल आझादनगर येथे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचा शुभारंभ जांभूळकर चौक येथे तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचा शुभारंभ “संत मदर तेरेसा चौक” येथे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी जगताप बोलत होते.
“विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुणे शहरात संपूर्ण देशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. शहरातील शाळा – महाविद्यालयांची संख्या व विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्थांच्याबाबत अनेक तक्रारी किंवा समस्या असतात, या तक्रारी अग्रक्रमाने सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विद्यार्थी सेल नेहमी तत्पर असतो.या सेलची शाखा वानवडी प्रभागात सुरू करून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक हक्काच्या समस्या निवारण केंद्राचे काम ही शाखा करेल”.
-प्रशांत जगताप (अध्यक्ष,शहर राष्ट्रवादी काँग्रेस)
यावेळी माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, किशोर कांबळे,आनंद सवाणे,संदीप जगताप,प्रफुल्ल जांभूळकर, केविन मॅन्युअल, अथर्व खेमकर,आशिष मोहिते,मृणालिनी वाणी,मीना पवार,भारती भालेराव , वैशाली भोसले,मॅगी येसुदास,ज्योती तेरदाळ,प्रमोद कांबळे,शाहनवाज शेख,शुभम भुजबळ,प्रमोद पासवान यांच्यासह महिला,युवक व विद्यार्थी सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.