पिंपरी, दि. 24 – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांवर जप्तीची धडक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (दि.23) रोजी एकाच दिवशी शहरातील विविध भागातील नामांकित सोसायट्यांमधील 50 सदनिका सील करण्यात आल्या. या सदनिका धारकांकडे 55 लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी थकीत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 82 हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत 2 लाख 87 हजार 446 मालमत्ता धारकांनी 466 कोटी रूपये कराचा भरणा केला आहे.
सहाय्यक आयुक्त देशमुख म्हणाले, महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. मात्र, शहरातील तीन लाख निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. वारंवार कर भरण्याचे आवाहन करूनही मालमत्ताधारक कर भरत नसल्याने महापालिकेला नाइलाजाने कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. बुधवारी एकाच दिवशी शहरातील नामांकित सोसायट्यांमधील 50 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. यापुढील काळातही थकबाकीदारांच्या सदनिका सील करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. त्यामुळे मालमत्ता धारकांनी थकबाकी आणि चालू वर्षाचा कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.
थकबाकी असणाऱ्या मालमत्ता जप्त केल्यानंतर अनेक मालमत्ताधारक त्वरीत कर भरत आहेत. मात्र, मालमत्ता जप्तीनंतरही काही जण कर भरत नसल्याचे समोर आले आहे. अशा मालमत्तांच्या लिलावाची कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे आणि त्याला स्थायी समितीची मान्यता पण घेण्यात आली आहे. मालमत्ता जप्त केल्यानंतर 21 दिवसांच्या आत कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
“या” नामांकित सोसायट्यांमधील सदनिका सील
पिंपरीतील ऍथिया, रावेतमधील पंचवटी, रेनबो, प्रोबो, वाकडमधील मॉन्ट व्हर्ट सेविल, पुनावळेतील सियोना, पिंपळे-सौदागर येथील शुभश्री वुड्स, लाईफ स्टाईल, चिंचवड येथील माइंड्स्पेस रिआलिटी क्कीन्स टाऊन, तळवडेतील देवी इंद्रायणी यासह आदी सोसायट्यांमधील सदनिकांचा समावेश आहे.