पिंपरी, दि. 24 – जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे. भोसरीतील चक्रपाणी वसाहतीजवळ मोकळ्या मैदानात हजारो वापरलेले इंजेक्शनचा ढीग आढळून आले. महापालिका आरोग्य विभागाने हा कचरा टाकणाऱ्या आस्थापनेचा शोध घेऊन 35 हजार रूपयांचा दंड आकारला आहे.
भोसरी येथील आळंदीरोडपासून चक्रपाणी वसाहत आणि पुढे मोकळ्या मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला वापरलेल्या इंजेक्शनचे तीन ढीग आढळून आले. यामध्ये हजारो इंजेक्शनसह रुग्णालय, दवाखान्यात वापरली जाणारी औषधांच्या बाटल्या, सलाईन व इतर जैववैद्यकीय कचरा होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी महापालिका आरोग्य विभागाला माहिती दिली. आरोग्य विभागाने तातडीने हा कचऱ्याचे ढीग उचलले. तसेच, कचऱ्यातील कागद, इंजेक्शन आणि औषधांच्या बाटल्यांवरून संबंधित वैद्यकीय आस्थापनेचा शोध घेतला.
याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे म्हणाले, भोसरीतील चक्रपाणी वसाहतीपासून काही अंतरावर मोकळ्या जागेत इंजेक्शन व वैद्यकीय साहित्य आढळून आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने हा वैद्यकीय कचरा उचलला. बेकायदेशीरपणे मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या आस्थापनेचा शोध घेतला. यामध्ये धावडे वस्ती येथील आनंद क्लिनिकमधील हा कचरा असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर 35 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.