पुणे – दिवसेंदिवस शहरात करोनाचा संसर्ग वाढत असून, पोलिसांनादेखील लागण होण्यास सुरुवात झाली आहे. संसर्ग झालेल्या पोलिसांवर उपचारासाठी शहरातील प्रमुख 3 हॉस्पिटलमधील 50 बेड राखीव ठेवले आहेत. त्यामध्ये नायडू, दिनानाथ आणि सह्याद्री या हॉस्पिटलचा समावेश आहे.
आजपर्यंत शहर पोलीस दलातील चौघांना करोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जलद हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, मागील चार दिवसांपूर्वी हॉटस्पॉट परिसरात कर्तव्य पार पाडणाऱ्या एका करोना संशयित पोलिसाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आला होता. जेव्हा हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर गेला तेव्हा त्यांनी तत्काळ पोलिसाला रुग्णालयात दाखल केले.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांचे कुटुंबीयही चिंतेत आहेत. एकापाठोपाठ एक पोलीस पॉझिटिव्ह येत असताना रुग्णालये मात्र त्यांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही पोलिसाची अडवणूक होऊ नये यासाठी रुग्णालयातील बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
इमारती ताब्यात घेण्यासाठी चाचपणी
दिवस-रात्र पोलीस करोना संकटाच्या काळात त्यांचे कर्तव्य निभावत आहेत. त्यातून पोलिसांतदेखील करोनाचा संसर्ग झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण केले आहे. विलगीकरण करण्यात आलेल्यांची संख्या मोठी आहे. भविष्यात ती वाढूदेखील शकते. त्यामुळे अगोदरच पोलिसांनी शहरातील काही शासकीय शैक्षणिक संस्थांच्या इमारती पोलिसांसाठी ताब्यात घेण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्या ठिकाणी गरज भासल्यास पोलिसांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.
दररोज ऑक्सिवॉच मशीनद्वारे तपासणी
करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक साधने सर्व पोलिसांना पुरविण्यात येत आहेत. तरीदेखील यापुढे प्रत्येक पोलिसांची दररोज ऑक्सिवॉच मशीनद्वारे तपासणी केली जाणार आहे. यासाठी सर्व पोलीस ठाणी व शाखांना मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तसेच दररोजच्या तपासणीचा अहवाल पोलीस आयुक्त कार्यालयाला द्यावा लागणार आहे.