मोदी सरकारची 5 वर्षे सर्वाधिक त्रासदायक – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची टीका

नवी दिल्ली- देशातील युवक, शेतकरी, व्यापारी आणि देशातील प्रत्येक संस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची पाच वर्षे सर्वाधिक त्रासदायक आणि विनाशकारी होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना बाहेरचा रस्ता दाखवला जायला हवा. असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. “पीटीआय’वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनमोहन सिंग यांनी देशात मोदी लाट असल्याचा समज फेटाळून लावला. सर्वसमावेशक विकासावर विश्‍वास नसलेले आणि केवळ राजकीय अस्तित्वाचीच चिंता असलेल्या मोदी सरकारला पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले.

100 वेळा सांगितल्याने असत्य हे सत्य होत नाही
एक असत्य शंभरवेळा सांगितले म्हणून सत्य होत नाही. जम्मू काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्यांची संख्या 176 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. तर पाकिस्तानच्या सीमेवरील शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रमाण गेल्या पाच वर्षात 1 हजार टक्‍क्‍यांनी वाढले आहे. भेद अणि विद्वेष हे शब्द भाजपसाठी समानार्थी बनले आहेत. राजकीय स्थानांवरील व्यक्‍ती आणि देशाबाहेर पळून गेलेल्या घोटाळेबाजांमध्ये निश्‍चितपणे एक संगनमत आहे, असा आरोपही मनमोहन सिंग यांनी केला.

गेली पाच वर्षे अनियंत्रित प्रमाणातील भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीची होती, अशा शब्दात मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर कडवट टीका केली. याशिवाय नोटबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याची टीका देखील सिंग यांनी केली.
मोदी यांच्या पाकिस्तानबाबतचे धोरण निष्कळजीपणाचे आहे. निमंत्रण नसताना पाकिस्तानला जाणे, पठाणकोटच हल्ल्यानंतर “आयएसआय’ला तपासासाठी पाचारण करणे यासारख्या कृत्यातून पाकिस्तानबाबत बेफिकीरीच दिसून येत असल्याची टीकाही मनमोहन सिंग यांनी केली.

देश मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मोदी सरकारच्या कारकिर्दीमध्ये देशाचे अर्थकारण भीषण अवस्थेमध्ये पोहोचले आहे. सद्यस्थितीचा शब्दच्छल करून विपर्यास करण्यास आता लोक कंटाळले आहेत. सातत्याने होणाऱ्या या आत्मप्रौढीतून निर्माण केलेल्या अपसमजाविरोधात एक नाराजी निर्माण झाली आहे, असेही मनमोहन सिंग म्हणाले.

राष्ट्रवाद आणि दहशतवाद या निवडणूकीतल्या मुद्दयांबाबत बोलताना मनमोहन सिंग यांनी मोदींच्या कटिबद्धतेवरच शंका उपस्थित केली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहिद झाले. त्यावेळी मोदी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळाच्या कमिटीची बैठक घेण्याऐवजी जीम कॉर्बेट अभयारण्यात चित्रपटाच्या चित्रीकरणात दंग होते. याचीही मनमोहन सिंग यांनी आठवण करून दिली. गुप्तचरांच्या अपयशामुळे झालेल्या पुलवामा हल्ल्यामुळे सरकार दहशतवादाविरोधात किती सज्ज आहे, हे उघड झाले आहे, असेही ते म्हणाले.

मोदी सरकारची पाच वर्षे ही प्रशासन आणि उत्तरदायित्वाच्य अपयशाची होती. 2014 मध्ये “अच्छे दिन’चे आश्‍वासन देऊन सत्तेवर आले. मात्र ही पाच वर्षे सर्वाधिक त्रासदायक आणि विनाशकारी होती. सामाजिक, राजकीय वातावरणातील सहत्वाची जाणीवच लोप पावली आहे. विदेशी धोरण नेहमीच मुत्सदेगिरी आणि सहिष्णूतेच्या आधारावर राहिलेले आहे. मात्र सध्या सरकारचे विदेश धोरण विकसित मुत्सदेगिरीच्या अभावावरच आधारलेले आहे, असेही मनमोहन सिंग म्हणाले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.