श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा कोबिंग ऑपरेशन राबवून वारंटमधील ५ आरोपींना शिताफीने अटक केली आहे. तसेच कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ९ गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करून पोलिसांनी ४ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वॉरंटमधील आरोपी लतीफ वशीर पठाण, भिकन नसीर सय्यद (रा.अशोकनगर), राहुल वापुसाहेव गायकवाड (रा.वडाळा महादेव), हर्षल कुंदनलाल चावला (रा. दशमेशनगर), राहुल राजेंद्र शिंपी (श्रीरामपूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच छोटा टेम्पो गाडी (एम.एच.१७ ए.जी.०५६०) या पांढऱ्या रंगाच्या वाहनामध्ये फैजल जब्बार शेख (वय 25 रा.ममदापूर ता. राहाता) हा गोवंशीय जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने घेऊन जाताना पोलिसांना मिळून आला.
त्याच्या ताब्यातून १ लाख ८ हजार रुपये किमतीच्या ९ गोवंशीय जातीचे लहान वासरे आणि ३ लाख ५० हजार रुपये किंमतीची टाटा एस गाडी असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. फैजल शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस हवालदार शफिक शेख, मच्छिंद्र शेलार, आर.ओ. कारखेले, शरद आहिरे, टेकाळे, राहुल नरवडे, संभाजी खरात, अजित पटारे, रमेश रोकडे यांनी केली.