पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी 5 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केला आहे.
पुण्यातील सार्वजनिक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास 4 ऐवजी 5 दिवस परवानगी देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सुट दिलेल्या गणेशोत्सवाखेरीज इतर सण, उत्सव तसेच ठेवून जिल्ह्यातील गणेशोत्सवासाठी 3 सप्टेंबर, 4 सप्टेंबर, 6 सप्टेंबर, 7 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत एकूण 5 दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.