सर्व थरांवरील भ्रष्टाचार नष्ट करीन – मुख्यमंत्री
मुंबई, दि. 13 – “मी सर्व थरांवरील भ्रष्टाचार नष्ट करीन. भ्रष्टाचारी इसम हा खालच्या पातळीवरील कर्मचारी असो वा वरच्या पातळीवरील असो या बाबतीत तडजोड नाही’, असे उद्गार मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी येथे काढले.
मान्सूनपूर्वी भूमिहीन मजूर व वर्गीकृत जाती-जमातींचे लोक यांना 25 हजार झोपड्या पुरविण्यांचेही आश्वासन चव्हाण यांनी दिले.
लोकसभेच्या स्पीकरविरुद्ध अविश्वासाचा ठराव
नवी दिल्ली – लोकसभेचे स्पीकर धिल्ला यांचेविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्याची नोटीस खासदार मधु लिमये यांनी आज दिली. धिल्ला यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा कमी केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
हृदयविकार बळावत आहे
नवी दिल्ली – देशात हृदयविकार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. म्हणून सरकारने हृदयविकाराचे संशोधनावर अधिक पैसा खर्च केला पाहिजे, असे लोकसभेत आज सभासदांनी सुचविले. त्यावर आरोग्यमंत्री डॉ. करणसिंग यांनी सभासदांच्या चिंतेत सहभागी असल्याचे सांगितले. तथापि सध्याच्या काळी संशोधनावर अधिक पैसा खर्च करणे केवळ अशक्य आहे. केवळ साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठीच पैसा खर्च करणे शक्य आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देता येणार नाही
मुंबई – महाराष्ट्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची शक्यता नसल्याचा सुस्पष्ट खुलासा अर्थमंत्री मधुकरराव चौधरी यांनी विधिमंडळात केला.