नोटा रद्द करण्याची सूचना अर्थमंत्र्यांनी फेटाळली
नवी दिल्ली, दि. 05 – 255 कोटी रुपयांच्या जादा करांची तरतूद असलेले 1975-76चे अर्थविधेयक आज लोकसभेने मंजूर केले. अंदाजपत्रकातील करयोजनेत अर्थमंत्र्यांनी आज आणखी सवलती जाहीर केल्या. सध्याच्या नोटा रद्द करण्याची सूचना अव्यवहार्य असल्याचे सांगून अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी ती फेटाळून लावली. काळा पैसा बाहेर यावा व “समांतर अर्थव्यवस्थे’ला आळा बसावा यासाठी नोटा रद्द करण्याची सूचना काही सदस्यांनी केली होती. सुब्रह्मण्यम म्हणाले की, भाववाढ गेल्या सप्टेंबरपासून कमी होत असली व सरकारही त्याबाबत जागरूक असले तरी भाववाढ अटोक्यात आलेली नाही.
मुद्रण व्यवसायावरील नवा कर रद्द
नवी दिल्ली – मोठी वृत्तपत्रे व नियतकालिके वगळता उरलेल्या सर्व मुद्रण व्यवसायावरील नवा एक टक्का अबकारी कर माफ केल्याचे आज अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी लोकसभेत जाहीर केले.
महाराष्ट्र सर्वात श्रीमंत राज्य
नवी दिल्ली – राज्य कर्मचाऱ्यांची महागाईभत्त्याविषयीची मागणी मान्य होण्यासाठी केंद्राकडून साहाय्य मिळावे, अशी महाराष्ट्र सरकारने जी मागणी केली आहे, त्या संदर्भात अर्थमंत्री सुब्रह्मण्यम म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. सहाव्या अर्थ आयोगामुळे राज्यांना पुरेशा साधनसंपत्तीची तरतूद झालेलीच आहे.