“गोव्याला राज्याचा दर्जा मिळण्यासाठी झटेल’
पणजी, दि. 7 – म. गो. पक्षाचे नव्याने सत्तेवर आलेले सरकार गोवा, दमण व दीवला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी झटेल, असा निर्धार नवनिर्वाचित मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी आज व्यक्त केला. शपथविधीनंतर त्या म्हणाल्या, राज्याचा दर्जा मिळेल तेव्हाही दीव व दमण हे गोव्याचेच भाग राहिले पाहिजेत. जनता पक्ष व कॉंग्रेस पक्ष यांनी जनहिताच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी होण्यासाठी सरकारला सहकार्य द्यावे; नकारात्मक भूमिका घेऊ नये, असे त्यांनी आवाहन केले.
राष्ट्रकुटुंब “विश्वकुटुंब’ व्हावे
नवी दिल्ली – पंतप्रधान मोरारजी देसाई आज राष्ट्रकुटुंब पंतप्रधान परिषदेसाठी लंडनकडे रवाना झाले. देसाई यांचेबरोबर परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी हेही आहेत. निरोपावेळी विमानतळावरील मुलाखतीत पंतप्रधान म्हणाले की, “राष्ट्रकुटुंब’ हे ब्रिटिश राष्ट्रकुटुंब आहे. ते विश्वकुटुंब व्हावे, असे मला वाटते. ते पुढे म्हणाले, आपण अमर्याद परकी मदत घेता कामा नये. कारण मग तशी भीक मागण्याची सवयच लागते. मदत घ्यावी पण आपणही थोडी फार मदत दुसऱ्याला करावी. श्रीमंत राष्ट्रांबद्दल आम्हास मत्सर नाही; पण आपले राष्ट्र प्रबळ करण्यासाठी आपण परिश्रम केले पाहिजेत.