जनता पार्टी हा कॉंग्रेसला पर्यायी पक्ष आहे
अहमदाबाद, दि. 17 – कॉंग्रेसला पर्याय म्हणून जनता पक्षाने मजबूत पाया उभा केला आहे, असे जनता पक्षाचे अध्यक्ष मोरारजी देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, “निवडणुकी होताच सर्व घटकपक्ष विसर्जित केले जातील.’
सौराष्ट्र विभागात देसाई हे निवडणूक प्रचार दौऱ्यासाठी आले असताना जुनागड येथे बोलताना म्हणाले, “जनता पार्टी सत्तेवर आली तर खेड्यांची स्थिती सुधारील आणि शहरांत येणारे लोकांचे लोंढे थांबवील. या लोकांना खेड्यांतच काम मिळवून दिले जाईल. त्यासाठी छोटे उद्योगधंदे उघडू’, असे सांगून मोरारजीभाई यांनी लोकांनी निवडणूक काळात शांतता पाळावी, असे आवाहन केले.
समाजसेवा व कार्यानुभव अभ्यासक्रमात तरतूद
पुणे – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजसेवा व कार्यानुभव हे विषय सक्तीचे करावेत व कला, शास्त्र, सामाजिक शास्त्र व वाणिज्य या विद्या शाखांच्या अभ्यासक्रमात तरतूद असावी, ही सूचना पुणे विद्यापीठाने मान्य केली असून त्या दृष्टीने प्रा. एस. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समती नेमली आहे.
अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदी महंमद दाउद
इस्लामाबाद – अफगाणिस्तान प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी महंमद दाउद यांची निवड झाल्याचे काबूल नभोवाणीवरून सांगण्यात आले. नव्या कायदेमंडळाने देशाच्या पहिल्या राज्यघटनेस मंजुरी दिलेली आहे.