आणीबाणीसंबंधीच्या दुरुस्तीस मंजुरी
नवी दिल्ली, दि. 23 – केवळ सशस्त्र बंडाळी झाली तरच आणीबाणी जारी करण्याच्या तरतुदीसाठी नियोजित घटनादुरुस्तीस आज जनता संसदीय पक्षाच्या कार्यकारिणीने मंजुरी दिली. देशाच्या विशिष्ट भागातच आणीबाणी जारी करण्याची तरतूद करण्याच्या सूचनेचा मात्र पुनर्विचार करावा, असे कार्यकारिणीचे मत आहे.
काही सदस्यांनी अशी विचारणा केली की समजा देशाच्या एका भागात आणीबाणी जारी केली गेली व दुसरीकडे आक्षेपार्ह कारवाया सुरू झाल्या तर सरकार काय करणार आहे?
“वंदे मातरम्’ जगात अजोड
हैदराबाद – “वंदे मातरम्’ने लोक आकर्षित झाले तितके जगात दुसऱ्या इतर कोणत्याही गीताने झालेले नाहीत. ज्या गीतासाठी जास्तीत जास्त लोकांनी शिक्षा भोगल्या, असेही वंदे मातरम् हेच गीत आहे, असे उद्गार संरक्षण खात्याचे राज्यमंत्री प्रा. शेरसिंग यांनी काढले. येथे काल “वंदे मातरम्’ या गीताच्या “शताब्दी समारोह स्पताहा’ची सांगता झाली.
युक्रेनच्या नेत्यांशी देसाईंची चर्चा
कीव्ह – पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी युक्रेनी नेत्यांशी चर्चा केली. अध्यक्ष ऍलेक्सी वॅटचेको व पंतप्रधान पियॉटर लियाश्को यांच्याशी देसाई बोलले.