सोलापूर – सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये बनावट कागदपत्राद्वारे 42 लाख 73 हजार 316 रूपयाचा अपहार केल्याचे उघड झाले असून तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकासह दोघांविरूध्द प्रशासकाने पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. सतीश निंबराज मुळे असे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकाचे नाव आहे तर कालिका अमृत मिल्क ऍन्ड मिल्क प्रॉड्नटस चे प्रोप्रा.बाळकृष्ण पवार अशी दोघा आरोपींची नावे आहेत.
दूध पंढरी नावाने प्रसिध्द असलेल्या सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाच्या दूग्ध विकास विभागाकडून विद्यमान संचालक बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली
. प्रशासक विनायक शिवाजीराव कदम यांनी तपासणी केली असता दि.22 जुलै 2020 ते दि. 4 ऑगस्ट 2020 या कालावधीत तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक असलेले सतीश मुळे यांनी आरोपी बाळकृष्ण पवार यांच्या कालिका मिल्क या संस्थेला 42 लाख 73 हजार 316 रूपयाचे दुधाची खोटी विक्री दाखवून संघाची फसवणुक केल्याचे दिसून आले.
दूध खरेदीदार संस्थेची कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता संघाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी नियुक्त केलेले असताना आरोपींशी संगनमत करून संचालक मंडळाच्या सभेत ठराव झालेला नसताना तो झालेला आहे, असे दाखवून सोलापूर जिल्हा दूध संघाची 42 लाख 73 हजार 316 रूपयाची आर्थिक फसवणुक केली, अशी फिर्याद विनायक कदम यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली.
त्यावरून पोलीसांनी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे आणि कालिका मिल्कचे बाळकृष्ण पवार या दोघांविरूध्द फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बरडे करीत आहेत.