अकरावी प्रवेश : लॉगिन आयडी, पासवर्ड मिळाला
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दोन दिवसांत 41 हजार 218 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. या सर्वांना लॉगिन आयडी व पासवर्डही त्वरीत मिळाला आहे.
करोना पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून यंदाही ऑनलाइन प्रवेश पद्धतच राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेची दोनवेळा मुदतही वाढवली आहे. प्रवेशासाठी 300 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून यात 1 लाख 5 हजार 412 जागा दर्शवल्या आहेत.
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी रविवारपासून (दि.26) सुुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून 1 ऑगस्टपासून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ऑनलाइन नोंदणीबाबत अद्यापपर्यंत कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत, अशी माहिती इयत्ता अकरावी प्रवेश नियंत्रण समिती सचिव तथा पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक मीना शेंडकर यांनी दिली.