नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच वीज पडून अनेकजण मृत्यूमुखी पडल्याच्या बातम्याही समोर आल्या. हीच वीज आता थेट अंतराळामधून वीज कशी दिसते हे दाखवणारा एक व्हिडिओ एका अंतराळवीराने पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Lightning from above. The violet fringes are mesmerizing. pic.twitter.com/eLCGMTbfTY
— Bob Behnken (@AstroBehnken) July 21, 2020
नॅशनल अॅस्ट्रोनॉटीक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाचा अंतराळवीर बॉब बेहकीन याने वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासहीत पडणारी वीज अंतराळामधून कशी दिसते हे दाखवणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. मागील काही आठवड्यांपासूनच बातम्यांमध्ये असणाऱ्या स्पेस एक्समधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या बॉबने पृथ्वीवर पडणारी वीज पृथ्वीपासून शेकडो किमीवरुन कशी दिसते याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. बॉबने शेअर केलेल्या या ९ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये काळ्या ढगांमध्ये चमकणाऱ्या विजा दिसत आहेत. “वरुन अशी दिसते वीज. त्या व्हायलेट फ्रिंज (विजेच्या उपशाखा) थक्क करणाऱ्या आहेत,” असे बॉबने व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे.
बॉबने पोस्ट केलेला हा व्हिडिओ दोन हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे. तर दीड लाखांहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला आहेत. रविवार २१ जून रोजी झालेल्या सूर्यग्रहणाचे फोटोही जून महिन्यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर काम करणाऱ्या क्रीस कॅसडी या अंतराळवीराने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले होते. अंतराळातून सूर्यग्रहण कसे दिसते हे दाखवणारे फोटो आणि जीफ चांगल्याच व्हायरल झालेल्या.