पिंपरी -महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाला 60 टक्क्यांपर्यंतच प्रतिसाद मिळतो आहे. मोबाइल नसणे, नेटवर्कमध्ये येणारे अडथळे, परराज्यात आणि परगावी निघून गेलेले विद्यार्थी आदी कारणांमुळे ही परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. तुलनेत खासगी शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे.
महापालिका प्राथमिक शाळांमध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 60 टक्के इतकेच आहे. म्हणजे जवळपास 40 टक्के विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षणात सहभागी होत नसल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 45 हजार विद्यार्थी आहेत. त्यापैकी 27 हजार विद्यार्थी प्रत्यक्ष ऑनलाइन शिक्षणात दररोज सहभागी होत आहेत. म्हणजे जवळपास 18 हजार विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. परराज्यात आणि परगावी निघून गेलेले विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. त्यातील काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे फोन बंद आहेत. तर, परराज्यातील काही विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात अडचणी येत आहेत.
जे विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासात सहभागी होऊ शकत नाही त्यांना शिक्षकांमार्फत दररोज होणाऱ्या अभ्यासाची माहिती दिली जात आहे. तसेच, त्यांच्याकडून गृहपाठ करून घेतला जात आहे. त्याबाबतच्या उजळणीसाठी त्यांना कागदावर प्रश्नावली दिली जात आहे. आठवड्यातून एक दिवस वह्या तपासल्या जात आहेत.
ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा
खासगी शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मोबाइलचा कॅमेरा बंद करून अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार वाढले आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थी कंटाळा करु लागले आहेत. त्यामुळे नियमित शाळा सुरू व्हावी, अशी अपेक्षा पालक व विद्यार्थी व्यक्त
करीत आहेत.
महापालिका प्राथमिक शाळांमध्ये सध्या ऑनलाइन शिक्षणासाठी दररोज सरासरी 60 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहण्यास मिळत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा येऊ नये, यासाठी त्यांना अभ्यासात गुंतवून ठेवण्याचे कौशल्य शिक्षक वापरत आहेत.
– स्मिता गौड,
प्रभारी प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग.