पिंपरी -अग्निशमन विभागासाठी सहा फायर फाइटिंग मोटारबाइक घेण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 80 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चासह महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी 101 कोटी 40 लाख 32 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी ऍड. नितीन लांडगे होते.
चाळीस लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या फायर फाइटिंग मोटारबाइकचा वापर अरुंद गल्ल्या, दाट वस्तीच्या झोपडपट्ट्यांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी होणार आहे. ज्या भागात चार चाकी वाहने जाऊ शकत नाही तेथे या मोटारबाइकद्वारे जाता येणार आहे. या बाइकमध्ये 20 लिटर क्षमतेच्या 2 पाण्याच्या टाक्या असून 30 मीटर लांबी पर्यंतचा पाइप असेल.
या पाइपला प्रेशर नोझल असल्यामुळे 50 फुटापर्यंत पाणी फेकले जाणार आहे. फायर फाइटिंग मोटारबाइकचा उपयोग एस्कॉर्टींग वाहन आणि पेट्रोलिंगसाठी होऊ शकतो. त्यामुळे तीन ऐवजी सहा फायर फाइटिंग मोटारबाइक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आणखी तीन मोटारबाइक घेण्यासाठी उपसूचनेद्वारे आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. 80 लाख 88 हजार रुपये खर्च होणार आहे.