स्विस बॅंकेतील नीरव मोदीची 4 खाती गोठवली

283 कोटींच्या संपत्तीवर टाच

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यात 13 हजार कोटींचा चुना लावत परदेशात फरार झालेल्या नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदीशी संबंधित स्वित्झर्लंडमधील बॅंकेतील चार खाती गोठवण्यात आली आहेत. नीरव मोदीने आपल्या स्वतःच्या खात्यावर 3,74,11,596 डॉलर आणि त्याची बहिण पूर्वी मोदीच्या खात्यावर 27,38,136 जीबीपी इतक्‍या रकमेच्या ठेवी जमा केल्या आहेत. दोघांच्याही खात्यांवर मिळून 283.16 कोटी रुपये जमा होते. या प्रकरणात भारताच्या तपास यंत्रणाकडून होणाऱ्या मागणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहेत.

गेल्या मार्चमध्ये अटक झाल्यापासून नीरव मोदी ईशान्य लंडनमधील वॅण्डसवर्थ तुरुंगात आहे. प्रत्यार्पणासंबंधी सुनावणी घेणाऱ्या वेस्ट मिन्सस्टर न्यायालयातील मॅजिस्ट्रेट मेरी एलिझाबेथ मेलॉन यांनी पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजे 27 जूनपर्यंत मोदी यास कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मोदी याने जामिनासाठी पाच लाख पौंड जमा करण्याची तयारी दर्शवून तीन वेळा जामिनासाठी अर्ज केला. मात्र मॅजिस्ट्रेट मेलॉन यांनी ते फेटाळले होते.

या प्रकरणात सलग दुसऱ्यांदा भारतीय तपास यंत्रणांना यश मिळाले आहे. यापूर्वी अलिकडेच अँटिग्वाच्या सरकारने मेहुल चोक्‍सीचे नागरिकत्व रद्द करून त्याला भारतात परत पाठवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोठडीत 25 जुलैपर्यंत वाढ
लंडनमधील वॅण्डसवर्थ तुरूंगात असलेल्या निरव मोदीने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्याच्या जामिन अर्जावर सुनावणी करताना त्याच्या कोठडीत 25 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली असून सलग चौथ्यांदा त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच या पुढील सुनावनींसाठी तो व्हिडिओ लिंकद्वारे हजर राहणार असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.