पंतप्रधान मोदी आणि शिंझो ऍबे यांच्यात विविध विषयांवर चर्चा

जागतिक अर्थकारण, फरार आर्थिक गुन्हेगार आणि आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर

ओसाका (जपान) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिझो आबे यांच्यत आज विविध विषयांवर व्यापक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान जागतिक अर्थकारण, फरार आर्थिक गुन्हेगार आणि आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश होता. जपानचे राजे नारुहितो यांच्या ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या राज्यारोहण समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार असल्याचेही मोदी यांनी यावेळी जाहीर केले. जपानमध्ये रेईवा युग सुरू झाल्यानंतर आणि पंतप्रधान मोदी यांची पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्यानंतर य दोन्ही नेत्यांची प्रथमच भेट झाली.

“जी-20′ परिषदेसाठी जपानमध्ये आपले आणि भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी आबे यांना धन्यवाद दिले. “जी-20′ परिषद आयोजित करण्यासाठी जपानने घेतलेल्या पुढाकाराचीही त्यांनी प्रशंसा केली.

ईशान्य भारतातील जपानच्या कामांबद्दल समाधान…
मोदी आणि आबे यांच्यातल्या चर्चेत मुंबई-अहमदाबाअ हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर आणि वाराणसी येथील कन्व्हेंशन सेंटरच्या बांधकामाचाही ओघवता उल्लेख आला. हे दोन्ही प्रकल्प वेळेवर पूर्ण होण्याला दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. ईशान्य भारतामध्ये जपानच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या कामांबाबतही मोदी यांनी समाधान व्यक्‍त केले. आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आदी क्षेत्रांमधील जपानचा अनुभव मोठा असल्याने जपानचे सहकार्य महत्वाचे असल्याचे मोदी म्हणाले. आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता असलेल्या देशांमधील नेत्यांना आपत्तीच्या समयी करायच्या कामांचा अनुभव असतो. या संदर्भात संयुक्‍त राष्ट्राच्या संघटनांशी स्पर्धा करण्याचा भारताच उद्देश नाही. कारण फेरबांधकामाची क्षमता भारताकडेही आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

जपानमध्ये रेईवा युगची सुरूवात झाल्याबद्दल मोदी यांनी आबे आणि जपानच्या नागरिकांचे अभिनंदन केले. जपानी भाषेत “रेईवा’ म्हणजे “सुसंवादाची आज्ञा’ किंवा पवित्र असा होतो. या वर्षाच्या अखेरीस आबे यांनी वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतभेटीवर येण्याची अपेक्षाही मोदी यांनी व्यक्‍त केली. दोन्ही नेत्यांमधील चर्चा खूप सौहार्दपूर्ण झाली. दोघेही जुने मित्र आहेत आणि त्यांच्यात द्विपक्षीय संबंधांबाबत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.

“जी-20′ परिषदेबाबतच्या अपेक्षांनी आबे यांनी चर्चेला सुरुवात केली. दोन्ही नेत्यांनी चर्चेमध्ये जागतिक अर्थकारणावर विशेष भर दिला. मोदी यांनी पूर्वीच्या “जी-20′ परिषदेमध्ये फरार आर्थिक गुन्हेगारांचा मुद्दा उपस्थित केला होता. या समस्येवर “जी-20’ने भ्रष्टाचार विरोधी उपाययोजनांचा भाग विचार करावा असा आग्रहही धरला होता.
याचा संदर्भ आबे यांनी या चर्चेच्यावेळी केला. जागतिक व्यपार आणि डाटा फ्लो सारख्या मुद्दयांनाही आबे यांनी अधोरेखित केले. “जी-20′ परिषदेमध्ये वातावरण बदलावरही विधायक उपाय योजना व्हाव्यात असेही ते म्हणाले.

भारत-जपानदरम्यान यावर्षी होणाऱ्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेच्या तयारीला आबे यांनी विशेष महत्व दिले आहे. या शिखर परिषदेमध्ये पायाभूत सुविधा, संरक्षण, अंतराळ, डिजीटल अर्थकारन आणि स्टार्ट अप आदी विषयी मंत्रालय पातळीवर बैठका होणार आहेत. आबे यांच्या या भेटीपूर्वी दोन्ही देशांच्या विदेश आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये “2+2′ सारख्या अनेक बैठका होणार आहेत, असे विजय गोखले यांनी सांगितले.

भारत आणि जपान मिळून केनियामध्ये कर्करोग उपचार रुग्णालय सुरू करणार आहेत. त्याबाबतही यावेळी चर्चा झाली. “जी-20′ दरम्यान आबे यांच्याव्यतिरिक्‍त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन आणि अन्य नेत्यांबरोबरही मोदींची चर्चा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.