काबुल – गेल्या 24 तासात एकूण 375 तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर 193 दहशतवादी जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांबरोबर झालेल्या विविध चकमकींमध्ये हे यश मिळाले आहे, असे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनाच्या हवाल्याने स्थानिक वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या विविध प्रातांमध्ये झालेल्या संघर्षात तालिबान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर भूभाग पुन्हा ताब्यात घेण्यात आला आहे. नुरिस्तान, लोगर, कंधार, ओरुझगान, हेरात, जॉजजान, बल्ख, समंगन, हेलमंद, कपिसा आणि बागलाण या प्रांतांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
अफगाणिस्तानच्या नॅशनल डिफेन्स ऍन्ड सिक्युरिटी फोर्सेसने अलिकडेच हेमंड प्रांताची राजधानी लष्कर गाह मध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 20 तालिबानी ठार झाले होते आणि 12 पेक्षा अधिक दहशतवादी जखमी झाले होते, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र तालिबानने अशी कोणतही हानी झाल्याचा दावा फेटाळला आहे. अफगाण फौजांनी रहिवासी भागांवरच हल्ले केल्याचे तालिबानी प्रवक्त्याने म्हटले आहे.
अफगाणिस्तानातील काही शहरांमध्ये तालिबान आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. एका जिल्ह्यामध्ये सोमवारी सकाळी अमेरिकेने हवाई हल्ले देखील केले आहेत. तालिबानने आशान्या अफगाणमधील ताखर सारख्या काह जिल्ह्यांवर ताबा मिळवला आहे.
देशभरात तालिबानने 223 जिल्ह्यांवर ताबा मिळवला आहे. तर 116 जिल्ह्यावर तालिबानचा प्रभाव होता. सध्या सरकारकडे 68 जिल्ह्याचा ताबा आहे. 34 पैकी 17 प्रांतीय राजधान्यांवर तालिबानचा अंकुश आहे.