वाल्हे – आषाढी एकादशी नंतर श्रावण मासारंभापर्यंत खेडोपाड्यात घरोघरी आखाड पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. आषाढाच्या उत्तरार्धातील मंगळवार आणि शुक्रवार हा देवाला कोंबडं, बकरे कापून नवस फेडण्याची परंपरा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात आहे. त्यामुळे गावरान कोंबड्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही करोनाचे सावट असले तरी आषाढात खवय्ये चमचमीत मांसाहारी भोजन मित्र मंडळींसोबत खाण्याची मौज लुटत असतात. पावसाळा सुरू असल्याने माशांचा विणीचा हंगाम असतो. या दिवसात मसे कमी प्रमाणात मिळतात. आखाड पार्टीचा बेत काहीसा खास असावा अन् त्यासोबतीला रसरशीत गावरान कोंबड्याचा ताव असावा, असे नियोजन असणाऱ्यांनी बाजारात तसेच आजूबाजूच्या खेडेगावात फेरफटका मारायला सुरवात केली आहे. “गावरान कोंबडा’ सगळ्यांच्या पसंतीला उतरत आहे.
आषाढ पार्टीसाठी खवय्यांची पहिली पसंती गावरान कोंबडाच असतो. तो ही लाल तुरा, बाग देणाराच असावा. त्यामुळे या दिवसात गावरान कोंबड्यांचे भाव गगनाला भिडतात. एरव्ही 400 ते 500 रूपयांत मिळणारा कोंबडा श्रावण सुरू होण्यापूर्वीच्या आठवड्यात बाजारात 550 रुपयांच्या पुढेच मिळत होता. या दिवसात गावरान कोंबड्यासोबतच वनराज कोंबडा आणि कडकनाथ कोंबडादेखील चांगलाच भाव खाऊन जातो.
ग्रामीण भागातील शेळ्या मेंढ्याचा बाजार करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बंद करण्यात आल्यामुळे गावरान कोंबडे भाव खात आहेत. चालू आठवड्यातील मंगळवार, बुधवारी (एकादशी असल्याने, काहीचा आणखी एक दिवस कमी झाला) शुक्रवार व आषाढी अमावस्या रविवार हे मांसाहर खवय्यांचे दिवस आहेत. पूर्वी ग्रामीण भागात या काळात बोकड किंवा मेंढा वाट्यावर लावला जायचा. पण आता लहान मुले बकऱ्याचे मटण खाण्यास नकार देतात आणि बकऱ्याच्या मटणाचे दरही वाढले आहेत. गावरान कोंबड्याची तुपातील बिर्याणी, सूप, गावरान मसाला, रसरशीत रस्सा आणि स्पेशल कोंबडी वडे, चुलीवरची भाकरी या घरगुती पदार्थांच्या मेजवाणीचे बेत आखले जाऊ लागले आहेत. सहकुटुंब मित्रमंडळी शेतात एकत्रीत येत किंवा शहरातील सोसायटीत काही कुटुंब अशा मेजवानीच्या बेतात आहेत. आषाढ महिन्याचा शेवटचा आठवडा हा मांसाहरी पदार्थांची मेजवानीचा आठवडा आहे.
सध्याचे दर
बकऱ्याचे मटन 650 रुपये किलो
ब्रॉयलर चिकन 240 रुपये किलो
लेअर चिकन 150 रुपये किलो
गावरान कोंबडा 550 रुपये
गावरान कोंबडी 300 रुपये
वनराज कोंबडा 350 रुपये
कडकनाथ कोंबडा 500 रुपये