पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मागील काही दिवसांत सायबर भामटे वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून आपले जाळे पसरवत आहेत. यामध्ये रिव्ह्युअर म्हणून काम करण्याचा टास्क देऊन बँक खाते रिकामे करण्याचा प्रकार घडत आहे. सुरवातीला पर रिव्ह्यू ५० रुपये खात्यात जमा केले जातात.
दोन- तीन हजार रुपये खात्यात जमा केल्यावर मोठमोठे टास्क घेण्यास सांगून रिव्ह्यू करणाऱ्यांशी गोड बोलूून त्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये वर्ग करून घेतले जात आहेत. अशाच दोन प्रकरणात रिव्ह्यूच्या आमिषाला बळी पडलेल्या एका महिलेला ४ लाख ७० हजार, तर दुसऱ्या महिलेला ६ लाख ४३ हजार रुपयांना फसविण्यात आले. या महिलांनी त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून पैसे वर्ग केले होते.
याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथे रहाणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पती नोकरी करत असल्याने घरबसल्या काहीतरी करावे म्हणून तिने वर्क फ्रॉमच्या होमच्या मेसेजला प्रतिसाद दिला. टास्क रिव्ह्यूसाठी या महिलेच्या बँक खात्याची माहिती घेण्यात आली. सुरवातीला तिच्या खात्यात टास्कचे २८०० रुपये वर्ग करण्यात आले.
यामुळे तिचा विश्वास बसला. त्यानंतर तिला एका टेलीग्रामधारकाशी जोडून मोठ्या रकमेचा टास्क टार्गेट पूर्ण करण्यास सांगण्यात आले. यामुळे तिने ३० हजार रुपये टास्क टार्गेटसाठी वर्ग केले. पुन्हा आणखी मोठ्या रकमेचे आमिष दाखवून ४ लाख ७० हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. मात्र, कमिशन आणि मूळ रक्कम न देता फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मंगल मोढवे करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत मुंढवा पोलीस ठाण्यात एका ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला गृहिणी आहे. तिला नेटक्लूज ए ५ या व्हॉटसअप ग्रुपवर ॲड करण्यात आले. यामध्ये टास्क पूर्ण करण्यासंदर्भात लिंक येत होत्या. एका लिंकला रिव्ह्यू केल्यास १५० रुपये देण्याचे आमिष दाखवले गेले होते. या लिंक आवडल्याने त्यांनी रिव्ह्यू करण्यास सुरवात केली. त्यांच्या बँक खात्यात ४५० रुपये जमा झाले.
त्यानंतर त्यांना टेलीग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. सुरवातीला दोन हजार मग दोन हजार आठशे रुपये फिर्यादीच्या बँक खात्यात ॲड करण्यात आले. त्यांना बरोबर जाळ्यात अडकवल्यावर त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी ६ लाख ४३ हजार रुपये उकळण्यात आले. फिर्यादीने तिच्या आणि पतीच्या खात्यांतून हे पैसे वर्ग केले होते.