अहमदाबाद – प्रेयसीला 1 कोटी रुपये देऊ न शकल्याने तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात उघडकीस आली आहे. लखन मखिजा (वय 31 वर्ष, रा. नाना चिलोदा, अहमदाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणात तरुणाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असून संबंधीत प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तरुणाच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, लखनच्या प्रेयसीने त्याच्याकडून तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. लखन पैसे देऊ शकला नाही. त्याने त्याच्या प्रेयसीला पैसे देण्यास नकार दिला तर तिने त्याच्याशी बोलणे थांबवले. याचा लखनवर मोठा परिणाम झाला. आणि त्याने 21 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान तरुणाच्या आईने पोलिसांत मुलाचे आणि त्याच्या प्रेयसीमधील व्हॉट्सअॅप चॅट सादर केले आहेत. मात्र अद्याप तिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर कुटुंबाला जबर हादरा बसला आहे. भावाच्या आत्महत्येला सहा दिवस उलटून गेले तरी अद्याप त्याच्या प्रेयसीविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे लखनच्या भावाने सांगितले. तर पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉकदरम्यान लखनची त्या तरुणीसोबत ओळख झाली. यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले आणि प्रेमात पडले. मात्र तिच्या डोक्यात काहीतरी वेगळच सुरू होते. तिला कॅनडाला शिफ्ट व्हायचे होते. यासाठी तिला व्हिसा पाहिजे होता. यासाठी तिने लखनकडे 1 कोटी रुपयांची केली होती. जेव्हा लखनने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिने लग्न करणार नसल्याचे सांगितले. याशिवाय तिने बोलणेही बंद केले. या सर्वाचा लखनच्या मनावर गंभीर परिणाम झाला आणि याच विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचे लखनच्या कुटुंबीयाने सांगितले.