नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा आणि खासदार राहुल गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने 2020 मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी नोटीस बजाविली आहे. या तिघांसह आणखी काही नेत्यांना देखील न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. ही नोटीस उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या दंगली प्रकरणी आहे. नोटीसीमध्ये न्यायालयाने पक्षकार म्हणून त्यांच्यावर खटला का चालवू नये, अशी विचारणा केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, केंद्रीय मंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते अनुराग ठाकूर, अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये, या सर्व नेत्यांकडून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात दिल्ली दंगलीच्या प्रकरणांमध्ये पक्षकार म्हणून खटला का चालवला जाऊ नये, याची उत्तरे मागितली आहेत.
न्या. सिद्धार्थ मृदुल आणि न्या. अनूप कुमार मेंदीरत्ता यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील दोन्ही पक्षांच्या वकिलांच्या याचिकेवर सुमारे 25 जणांना नोटीस पाठवली आहे. त्यात भाजप नेते कपिल मिश्रा, भाजप खासदार प्रवेश वर्मा, आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान, वारिस पठाण, महमूद पार्चा आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांचा समावेश आहे. या सर्व जणांवर दंगली भडकवण्याप्रकरणी भाष्य केल्याचा आरोप आहे.