किव्ह – एका बाजूला बेलरस सीमेवर युक्रेनशी चर्चा सुरू असतानाच रशियाने आपल्या आक्रमाणाची धार वाढवत असल्याचे नेमके विरोधाभासी चित्र समोर येत आहे. राजधानी किव्हच्या दिशेने जाणाऱ्या लष्करी वाहनांचा मैलोन् मैल ताफा उपग्रहावरून टीपलेल्या छायाचित्रातून दिसत आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा आजचा पाचवा दिवस आहे. रशियाने पूर्ण शक्ती पणाला लावूनही महत्वाच्या शहरांवर ताबा मिळवता आला नाही. त्यांना अनपेक्षित अशा कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे.
हे युध्द सुरू झाल्यापासून उभय देशांत पहिल्यांदाच थेट चर्चा होत आहे. मात्र, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ही चर्चा सुरू होण्यापुर्वीच तातडीने शस्त्रसंधी आणि रशियन सैन्याच्या माघारीची मागणी केली आहे. झेलेन्स्की या चर्चेच्या सफलतेविषयी शंका व्यक्त केली आहे.
व्यक्तीश: ते या चर्चेत सहभागी होत नाहीत. या बैठकीच्या फलितावर माझा बिल्कूल विश्वास नाही. पण युध्द थांबवण्यासाठी मी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी पुसटशी शंका कोणासही येऊ नये म्हणून आणि त्यासाठी छोटी संधीही सोडायची नाही म्हणून हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या चर्चेतून शांतताचा एक आशेचा किरण युक्रेनच्या नागरिकांना दिसत असला तरी उभय राष्ट्रांमधील हालचाली मात्र हा तणाव तातडीने हा तणाव संपवण्याच्या दिशेने नसल्याचे सांगत आहे. नाटो राष्ट्रांनी युक्रेनच्या फौजांना शस्त्रे आणि अन्य मदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या बाजूला रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध कडक केले जात आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी रविवारीआण्विक हल्ला कृती दलाला अतीसतर्क राहण्याचा संदेश दिला आहे.