पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरासह जिल्ह्यातून होळीसाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध एसटी आगारासह स्वारगेट आगारातून अनेक प्रवाशांसाठी बसला गर्दी होते. या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने ३० जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट व पिंपरी चिंचवड आगारातून या जादा बस सोडण्यात येणार आहे.
दि. २४ मार्चला होळी उत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच आदल्या दिवशी सुट्टी आल्यामुळे दि. २१ मार्चपासून स्वारगेट व पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्यास सुरुवात केली जाणार आहे. स्वारगेट आगारातून चिपळूणसाठी सातारामार्गे बस असणार आहे. तर, दापोलीसाठी भोर मार्गे, खेडसाठी भोर मार्गे बस सोडण्यात येणार आहेत. तर, पिंपरी चिंचवड आगारातून चिपळूण, गुहाघर, देवरूख, रत्नागिरी, दापोली, खेड, पोलादपूरसाठी बस सोडण्यात येणार आहेत.
या बसचे आरक्षण एसटीच्या वेबसाईटवर जाऊन करता येईल. त्याबरोबरच स्थानक व मान्यता प्राप्त खासगी एजंटमार्फत देखील आरक्षण करता येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी बस सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.