श्रीनगर – जम्मू-कश्मीरमधे आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी दक्षिणेकडील काश्मीर जिल्ह्यातील त्रालमधील गुलशनपोरा भागात शोध मोहीम सुरू केली. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करायला सुरुवात केल्यावर चकमकीला सुरुवात झाली. त्यामध्ये सुरुवातीला दोन दहशतवादी ठार झाले.
अधिक तपास केल्यावर आणखी एक दहशतवादीही याच भागात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर पुन्हा झालेल्या चकमकीमध्ये हा तिसरा दहशतवादीही ठार झाला. या भागात अजूनही शोधमोहिम सुरु आहे. हे दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत आणि त्यांच्याकडून कोणकोणती शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली, याबाबतची माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकली नाही.