अथेन्स : निर्वासितांची बेकायदेशीर वाहतुक करणारी बोट समुद्रात बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 12 निर्वासितांना जलसमाधी मिळाली आहे. ग्रीसच्या पश्चिमेकडील पेक्सोस बेटाजवळ शनिवारी ही बोट बुडाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आतापर्यंत 12 निर्वासितांचे मृतदेह सापडले आहेत. तर 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे, असे ग्रीसच्या कोस्ट गार्डने अमेरिकेतील वर्तमानपत्राला सांगितले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजता समुद्रात एक बोट संकटात असल्याचा संदेश कोस्ट गार्डला मिळाला.
या बोटीवरील एका निर्वासिताने आपत्कालिन सेवेला फोनवरून याबाबत कळवले होते. या मृतांबाबत अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. तसेच बोट बुडण्यामागील नेमके कारणही समजू शकलेले नाही, असे ग्रीसच्या कोस्ट गार्डचे प्रवक्ते निकोलस लॅगाडियानो यांनी सांगितले.
दुर्घटना घडली तेंव्हा हवामान सर्वसामान्य होते. कदाचित बोटीमध्ये प्रमाणापेक्षा अधिक माणसे बसली असावीत, असेही त्यांनी सांगितले.
या बोटीतील अन्य निर्वासितांच्या शोधासाठी मोठी शोध मोहिम हाती घेतली गेली आहे.
या परिसरामध्ये कोस्ट गार्डच्या सहा बोटी तपास घेत आहेत. याशिवाय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टर आणि मासेमारी करणाऱ्या चार बोटींद्वारेही तपास केला जात आहे.