वॉशिंग्टन : बनावट विद्यापीठात प्रवेश घेतल्याचे कारण दाखवून अमेरिकेत आलेल्या आणखी 90 विद्यार्थ्यांना अमेरिकन प्रशासनाने अटक केली. यातील बहुतांश मुले भारतातील आहेत. त्यामुळे अशा प्रकरणात ताव्यात घेतलेल्या मुलांची संख्या अडीचशेहून अधिक झाली आहे.
अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम विभागाने मार्च महिन्यात मिशिगन राज्यातील बोगस विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या 161 विद्यार्थ्यांना अटक केली होती. त्यात आणखी 90 विद्यार्थ्यांची भर पडल्याचे वृत्त अमेरिकेतील डेट्रॉईट फ्री प्रेस या दैनिकात मंगळवारी प्रकाशित झाले. त्यानंतर तेथे हॅशटॅग अबॉलिश आयसीई हा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे.
ज्यवेळी हे बोगस विद्यापीठ बंद करण्यात आले, त्यावेळी तेथे 600 विद्यार्थी शिक्षण घेत होते. या विद्यार्थ्यांना फर्मिंग्टन येथील विद्यापीठात प्रवेशाच्या बहाण्याने अमेरिकेत आणले होते. नंतर ते विद्यापीठ बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते.
या पकडलेल्या मुलांपैकी सुमारे 80 टक्के विद्यार्थ्यांना परत जाण्याचा तात्पुरता परवाना देण्यात आला आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांना तो देण्यासाठी अंतिम आदेश बाकी आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. सरकारी वकीलांनी तेथे वर्ग खोल्याच नसल्याने हे बोगस विद्यापीठ असल्याची कल्पना विद्यार्थ्यांना होती, असे म्हटले आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे वरीष्ठ सदस्य एलिझाबेद वॉरेन यांनी या फसवणुकीचे वर्णन अत्यंत क्रुर असे केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले असून उच्च दर्जाचे उच्च शिक्षण अमेरिकेत घ्यायचे या विद्यार्थ्यांचे स्वप्न होते. इमिग्रशन आणि कस्टम विभागाने त्यांना पकडले आहे. त्यांची मायदेशी पाठवणी करा.
या विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या भारतातील दुतावासाकडून वैध व्हिसा घेतला होता. त्यामुळे त्यांचा तो दर्जा कायम राहिला पाहिजे, असे मत टेक्सासचे ऍटर्नी राहुल रेड्डी यांनी व्यक्त केले.