पूर्ण वेळ संचालक नसल्याने प्रकरणे रखडली : लघू उद्योगास चालना मिळणार कशी?
पुणे – देशात “हनी मिशन’च्या माध्यमातून लघू उद्योगास चालना देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. यासाठी आवश्यक संशोधन आणि प्रशिक्षण कार्य पुण्यातील केंद्रीय मधूमक्षिका संशोधन व प्रशिक्षण केंद्र (सीबीआरटीआय) याठिकाणी होणार आहे. मात्र, संस्थेत सध्या मनुष्यबळाचा तुटवडा असून, केवळ 24 कर्मचाऱ्यांद्वारे राष्ट्रीय “हनी मिशन’ कसे साकारायचे? असा प्रश्न आहे.
सीबीआरटीआय संस्थेला पूर्ण वेळ संचालक नसल्याने अनेक महत्त्वाच्या फाइल्सवर स्वाक्षरी होण्यासाठी विलंब होतो. मधमाशा पालनसंबंधी प्रशिक्षण देणारे केवळ आठच टेक्निशिअन आहेत. तर साडेतीन हजार पुस्तकांच्या ग्रंथालयाला गेल्या काही वर्षांपासून ग्रंथपालच नसून, शिपायामार्फत ग्रंथालयाचे कामकाज पाहिले जात आहे.
त्यातच पॅथोलॉजी, एन्टोलॉजी डिपार्टमेंटही गेल्या चार-पाच वर्षांपासून बंद आहेत. तर हनी प्रोसेसिंग युनिटही पूर्णतः कार्यक्षमतेने कार्यरत नाही. त्यातच मधमाशा पालनासंबंधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी निवृत्त अधिकाऱ्यांना आमंत्रित करावे लागते.
सध्याचे मुंबई येथील डायरेक्टर डॉ. संजीव रॉय यांच्याकडेच पुण्याचाही कार्यभार दिला आहे. ते मुंबई येथे सोमवार ते शुक्रवार असतात. तर शनिवारी पुणे कार्यालयाला भेट देतात. त्यामुळे आठवडाभरानंतर कामकाजाच्या फाईल्सवर स्वाक्षरी होतात. अशा परिस्थितीत केंद्राचे दैनंदिन कामकाज करण्यातच अडचण निर्माण होते, तिथे राष्ट्रीय “हनी मिशन’ कसे साकारायचे असा प्रश्न निर्माण होतो.
नोकर भरती होणार तरी कधी?
संस्थेच्या शिवाजीनगर येथील या कार्यालयात 1983 दरम्यान 72 कर्मचारी होते. आता ही संख्या फक्त 24 वर आली आहे. असे असताना मधूक्रांती मिशन, मधमाशा पालनांसंबंधीचे क्लस्टर डेव्हलमेंट यासारखी कामे मार्गी कशी लागणार? त्यामुळे हनी मिशनसहीत अन्य मधमाशा पालन प्रशिक्षण कार्यक्रम तसेच अन्य कामकाजासाठी नोकर भरती त्वरीत कऱण्याची मागणीही केंद्राकडून करण्यात येत आहे.