नवी दिल्ली – देशात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कलेक्शनने सरकारच्या तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. मार्च 2023मध्ये देशाचे जीएसटी संकलन 1 लाख 60 हजार 122 कोटी रुपये इतके झाले. जीएसटीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हे दुसरे उच्चांकी संकलन आहे. जीएसटी कर संकलनाच्या दृष्टीने गतवर्षीपेक्षा एकूण संकलनात 22 टक्के वाढ झाली आहे.
देशातील जीएसटीच्या इतिहासातील हे दुसरे सर्वोच्च महसूल संकलन आहे. एप्रिल 2022 नंतरचे दुसरे सर्वोच्च जीएसटी संकलन आहे. मार्च 2023 च्या जीएसटी संकलनातील विशेष बाब म्हणजे सलग 14 महिने जीएसटी संकलन हे 1.4 लाख कोटी रुपयांच्यावर राहिले आहे. दुसरीकडे देशात जीएसटी लागू झाल्यापासून जीएसटी संकलन 1.6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेच यंदाच्या वर्षी जीएसटी महसुलात 13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
मार्च 2023 मध्ये एकत्रि आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 18.10 लाख कोटी रुपये जीएसटी कर जमा करण्यात आला. दर महिन्याला सरासरी 1.51 लाख कोटींचा महसूल जमा करण्यात आला. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 22 टक्के अधिक जीएसटी जमा झाला.
महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी
मार्च 2023 मध्येही सर्वाधिक जीएसटी संकलन महाराष्ट्रातून करण्यात आले. महाराष्ट्रातून 22 हजार 695 कोटी जीएसटी जमा करण्यात आला. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे. गुजरातमधून 9 हजार 919 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला. तर तिसऱ्या स्थानावरील तामिळनाडूमधून 9 हजार 245 कोटी, तर हरयाणामधून 7 हजार 780 कोटींचा जीएसटी जमा झाला आहे.