नागपूर – शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी निवासस्थान सिल्व्हर ओकवर पोहोचले. त्यानंतर आज शरद पवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. गेल्या 24 तासांत राजकीय क्षेत्रात घडलेल्या या मोठ्या घडामोडींमुळे आता राजकारण आणखी काय नवं घडणार का? यावर चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळच्या सुमारास ते नागपूर विमानतळावर दाखल झाले. आजपासून दोन दिवस त्यांचा नागपूर दौरा सुरू झाला असून एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीसाठी गेले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये एक बैठक देखील झाली.
या बैठकीत त्यांच्यासोबत अनिल देशमुख सुद्धा होते. या तिघांनी मिळून एकत्र जेवणही केलं. तीन राजकीय मोठे नेते एकत्र आल्यामुळे या बैठकीत काही महत्त्वांच्या विषयावर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. संभाजीनगरमध्ये उद्भवलेल्या तणावाची परिस्थिती किंवा महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीविषयी या बैठकीत चर्चा होऊ शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर राजकारणात कधी काय होईल, याचा काही नेम सांगता येत नाही. त्यामुळे येत्या निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणात घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत. पुढील काळात राजकाणात मोठे बदल होतील, अशी चर्चा वर्तवण्यात येत आहे. शरद पवार यांनी विमानतळावरून वसंतदादा इंस्टिट्यूटच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर ते कॉंग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्या शेतावर गेले. तिथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी भेट दिली.
ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आला नसल्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यातच असल्याचे समजते. या तिन्ही नेत्यामध्ये कुठल्या मुद्यावर चर्चा झाली. याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.
दीड महिन्यात दुसरी भेट
गेल्या दीड महिन्यात नागपुरात शरद पवार आणि नितीन गडकरी यांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी 12 फेब्रुवारीला शरद पवार नागपूर आणि वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळीही विमानतळावर शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भेट झाली होती. याप्रसंगी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली होती.