बीड – बीड शहरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थ्यांने कुटुंबियांना व्हॉट्सअॅपवर मेसेज करत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्यांने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. धक्कादायक म्हणजे सावकारांकडून घेतलेले पैसे व्याजासह देऊनही त्यांनी तरुणाच्या कुटुंबियांना त्रास दिला यातूनच तरुणाने आत्महत्या केली आहे.
पंकज बबन काळे, वय 21 असे आत्महत्या केलेल्या तरुणाने नाव आहे. तो बीड मधील जिजामाता चौक येथे कुटुंबीयांसोबत राहत होता. पंकज ने आत्महतेपुर्वी “मी हे सहन करू शकत नाही, मला माफ करा” असा व्हॉट्सअॅपवर कुटुंबियांना मेसेज केला त्यानंतर त्याने गळफास घेतला. याप्रकरणी पाच सावकारांविरोधात बीड शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर पिंगळे, रंणजीत पिंगळे, राजकुमार गुरखुदे, हनुमंत उर्फ बंडू पिंगळे आणि आशिष सोनी असे गुन्हा दाखल केलेल्या सावकारांची नावे आहेत. यापैकी एका सावकाराला पोलीसांनी ताब्यात घेतले असून इतर फरार आहेत.
आत्महत्याग्रस्त पंकजचे वडील बबन काळे हे माजलगाव पंचायत समितीत विस्ताराधिकारी आहेत. त्यांनी किशोर बाजीराव पिंगळे या सावकाराकडून 7 लाख रुपये 2019 मध्ये 10 रुपये शेकडा दराने घेतले होते. या पैशाच्या बदल्यात सावकाराने काळे यांची 60 आर जमीन व राहते घर नोटरी करून घेतले होते. त्यानंतर काळे यांनी व्याजासह मूळ रक्कम पिंगळे यास परत केली मात्र तरीसुद्धा पिंगळे याने बबन काळे यांच्या पत्नीवर धनादेश न वटल्याचा गुन्हा दाखल केला. याशिवाय पिंगळेकडून सतत मारहाण व धमक्या येऊ लागल्या यातूनच पंकज याने राहत्या घरात गळफास घेतला. त्यावेळी तो घरात एकटाच होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.