नवी दिल्ली, दि. 7 – विदेशातील पनामा पेपर्स आणि पॅराडाईस पेपर्स च्या माध्यमातून जगभरातील काळा पैसा गुंतवणाऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यात 930 भारतीयांची नावे असून त्यांच्या सुमारे 20 हजार 353 कोटींच्या गुंतवणुकी उघड झाल्या असून त्यांच्याकडून कर व दंड वसुली सुरू करण्यात आली आहे अशी माहिती सरकारतर्फे आज राज्यसभेत देण्यात आली.
या संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, आत्तापर्यंत या व्यक्तींकडून 153 कोटी 88 लाख रूपयांचा कर वसुल करण्यात आला आहे. या पेपर्स मधून मिळालेल्या माहितीची शहानिशा भारतातीाल यंत्रणाकडून सुरू करण्यात आली असून 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत यातील 20 हजार 353 कोटी रूपयांची छुपी गुंतवणूक उघडकीला आली आहे.
विदेशात गुप्तपणे पैसा ठेऊन भारतातील कर चुकवणाऱ्यांच्या विरोधात प्रत्यक्ष करातील कायद्यान्वये कारवाई केली जात आहे असे मंत्र्यांनी सांगितले. यातील 52 प्रकरणात काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत असे ते म्हणाले. अन्य 130 प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे असेही मंत्र्यांनी नमूद केले. पनामा पेपर्स आणि पॅराडाईस पेपर मधून मिळालेल्या माहितीची वेगवान चौकशी केली जात आहे असे ते म्हणाले.