पिंपरी – किवळे येथील “द्वारका लॉजिंग ॲन्ड बोर्डिंग’वर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा घातला. यावेळी दहा महिलांची सुटका करण्यात आली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
मुंबई-बंगलोर महामार्गावरील किवळे-देहूरोड येथील द्वारका लॉजिंग ॲन्ड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास या लॉजवर छापा घातला. यावेळी एक परदेशी, सहा इतर राज्यातील आणि तीन राज्यातील अशा एकूण 10 पीडित महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली.
यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 11 हजार 400 रुपये रोख रक्कम, 14 हजार रुपयांचे दोन मोबाइल, 300 रुपये किमतीचे इतर साहित्य असा एकूण 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एजंट ग्राहकांकडून 3 हजार रुपये घ्यायचे आणि देहविक्री करणाऱ्या महिलांना 500 रुपये द्यायचे.
गवी रंगा कृष्णा गोवडा (वय 38, रा. द्वारका लॉजिंग ॲन्ड बोर्डिंग, किवळे-देहूरोड), लॉजचा मॅनेजर रामसुख अयोध्याप्रसाद पटेल (रा. गांवदेवी रोड, बोईसर, मुंबई) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच लॉजचा मालक प्रताप शेट्टी (वय 40, रा. कात्रज, पुणे) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस स्टेशन करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, कर्मचारी विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, भगवंता मुठे, अनिल महाजन, जालिंदर गारे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, राजेश कोकाटे, योगेश तिडके यांनी केली आहे.