ह्युस्टन – अमेरिकेतील टेक्सास प्रांतातल्या अल पासो शहरामधील वॉलमार्ट स्टोअरमध्ये एका बंदुकधाऱ्याने केलेल्या अंधाधुंद गोळीबारामध्ये किमान 20 जण ठार झाले आहेत. या घटनेमध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत. सामुहिक हत्याकांडाची ही सर्वात अलिकडील भीषण घटना आहे. गोळीबारामध्ये सर्व वयोगटातील स्त्रिया आणि पुरुषांचा समावेश आहे, असे अल पासो पोलिस प्रमुख ग्रेग ऍलेन यांनी सांगितले. ही घटन अत्यंत भीषण असल्याचे त्यांनी सांगितले.
पॅट्रीक क्रूसियस असे हल्लेखोराचे नाव असून तो डल्लास उपनगरातील रहिवासी आहे. त्याने वॉलमार्ट स्टोअरबाहेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून त्याला कोठडीत पाठवण्यात आले आहे. टेक्सासमधील स्पॅनिश बोलणाऱ्या हिस्पॅनिक लोकांच्या घुसखोरीला विरोध म्हणून हे आक्रमण आपण केल्याची पोस्ट त्याने केली आहे. स्पॅनिश लोकांमुळे अमेरिकेतील लोकांना नोकऱ्या मिळत नसल्याचा त्याचा दावा आहे.
शनिवारी सकाळी वॉलमार्ट स्टोअरमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकंची गर्दी खूप होती. त्यावेळी या बंदुकधाऱ्याने गर्दीवर गोळीबार करायला सुरुवात केली. यामध्ये स्टोअरच्या कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिक जखमी झाले. काही जण जागेवर गतप्राण झाले. तर अनेकांनी दरवाज्याच्या दिशेने पळ काढले. काही जण जमिनीवर घसरून पडले. स्टोअरच्या पार्किंगम्ध्ये अनेकांचे मृतदेह पडलेले मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणात आढळले.
या गोळीबारामध्ये 20 जण ठार आणि 26 जण जखमी झाले आहेत, असे टेक्सासचे गव्हर्नर ग़्रेग ऍबॉट यांनी सांगितले. मरण पावलेल्या नागरिकांप्रती त्यांनी सहवेदनाही व्यक्त केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. हा हल्ला भ्याड असून निरपराध व्यक्तींच्या हत्येचे कोणतेही समर्थन केले जाऊ शकत नाही, असे ट्रम्प म्हणाले.
मरण पावलेल्या व्यक्तींमध्ये मेक्सिकोच्या 6 जणांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 9 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. हे सर्वजण 32 ते 82 वर्षे वयाचे आहेत. अल पासो मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये 2 वर्षांच्या दोन मुलांचाही समावेश आहे.
आठवड्याभरापूर्वीच मिसिसीपीमधील वॉलमार्ट स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात दोघेजण ठार झाले होते. रविवारी नॉर्थ कॅरोलिनातील गिलरॉय गार्लिक फेस्टिव्हलमध्येही अशाच प्रकारे झालेल्या गोळीबारात तिघेजण जखमी झाले होते.