लंडन – जगात सर्वत्रच अद्यापही शेरलॉक होम्स या काल्पनिक डिटेक्टिवबाबत सर्वांना उत्सुकता आहे. हे काल्पनिक डिटेक्टीव पात्र निर्माण करणारा लेखक आर्थर कॉनन डायल यांच्या विषयी लोकांना उत्सुकता आहे.
होम्स नायक असलेल्या हाऊंड ऑफ द बास्करविल्स या गाजलेल्या कादंबरीच्या मूळ स्क्रिप्टचे एक पान तीन कोटी रुपयांना लिलावात विकले गेले. 20 सेंटीमीटर बाय 30 सेंटिमीटर आकाराचा या कागदावर या मूळ कादंबरीचे काही लिखाण आहे.
टेक्सासमधील दलास येथील एका खाजगी संग्रहकाने लिलाव प्रक्रियेत हा कागद विकत घेतला. लेखक सर डोइल यांच्या अक्षरातील या कागदावर प्रकरण-8 फिक्सिंग द नेटस असा मजकूर असून त्यावर त्यामध्ये होम्स आणि त्याचे सहकारी डॉक्टर वॉटसन यांच्यातील संभाषण आहे. या पानावर लेखक डायल यांनी काही खाडाखोड केली असून त्या ठिकाणी नव्याने मजकूर लिहिल्याचेही दिसत आहे.
या कादंबरीची मूळ प्रत 185 कागदांची होती पण आता फक्त पस्तीस पाने सध्या शिल्लक आहेत. लेखकाने 1902 मध्ये ही कादंबरी लिहिली होती. त्यापूर्वी आठ वर्षांपूर्वी लेखकाने होम्सचे पात्र संपवले होते. पण हजारो वाचकांच्या आग्रहास्तव या कादंबरीच्या निमित्ताने डायल यांनी पुन्हा एकदा शेरलॉक होम्सला जिवंत केले होते.
त्यामुळे या कादंबरीचे विशेष महत्त्व मानण्यात येते. कॉनन डायल यांचे हे सर्वात लोकप्रिय पुस्तक मानले जाते.