श्योपूर – कुनो नॅशनल पार्कमध्ये गुरुवारी ज्वाला चित्ताच्या आणखी दोन पिल्लांचा मृत्यू झाला. मंगळवारी एका चित्त्याच्या पिलाचा मृत्यू झाला होता. दोन महिन्यांत आतापर्यंत 6 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. कुनोमध्ये मादी चित्ता ज्वालाने 27 मार्च रोजी चार पिल्लांना जन्म दिला होता. यापैकी दोन पिल्ले कुपोषणामुळे दगावली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पहिल्या खेपेत 8 चित्ते नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी त्यांना बंदिवासात सोडण्यात आले. यानंतर 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते कुनो येथे आणण्यात आले. कुनो नॅशनल पार्कमध्ये आता फक्त 18 चित्ते उरले आहेत.
चित्ता प्रोजेक्टबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांना यामुळे मोठा फटका बसला आहे. अधिकृत माहितीनुसार, 23 मे रोजी सकाळी मादी चित्ता ज्वालाच्या एका पिल्लाचा मृत्यू झाला. यानंतर पालपूरमध्ये तैनात वन्यजीव डॉक्टरांचे पथक आणि निगराणी पथकाने दिवसभर उर्वरित तीन पिल्ले आणि मादी चित्ता ज्वाला यांचे निरीक्षण केले. चित्ता ज्वालाला दिवसा पूरक आहार देण्यात आला. उर्वरित तीन शावकांची प्रकृती निरीक्षणादरम्यान सामान्य दिसत नव्हती.
उष्माघाताचीही शक्यता –
विशेष गोष्ट म्हणजे 23 मे हा या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवसदेखील होता. दिवसाचे कमाल तापमान 46 ते 47 अंश सेल्सियसच्या आसपास होते. दिवसभर उष्ण वारे आणि उष्णतेच्या लाटा सुरू होत्या. त्यामुळे उष्माघातामुळे ही पिल्ले दगावल्याचाही अंदाज आहे. यासह आणखी एक पिल्लू सध्या अतिदक्षता विभागात आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. मादी चित्ता ज्वालाही निरोगी आहे. तिच्यावरही सतत नजर ठेवण्यात येत आहे.