लंडन – स्कॉटलंडमधील एका निसर्गरम्य धबधब्यामध्ये पडून २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही विद्यार्थी ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. जेमतेम २२ आणि २६ वर्षांचे असलेले हे दोघेही मूळचे आंध्र प्रदेशातील होते, अशी माहीती मिळाली आहे. मात्र स्कॉटलंड पोलिसांकडून अद्याप या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली गेलेली नाहीत. या दोघांच्यही मृतदेहांचे शवविच्छेदन आज केले जाणार आहे. (2 Indian students killed in Scottish waterfall accident)
पर्थशायरमधील ब्लेअर ऑफ अथोली जवळच्या लिन ऑफ तम्मेल धबधब्यामध्ये बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. मित्रांबरोबर फिरायला गेले असताना हे दोघे जण पाण्यामध्ये पडले. त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा कून आपत्कालिन पथकाला पाचारण केले. बुधवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या दोन मित्रांच्या बेपत्ता होण्याबाबतची माहीती मिळाली होती. त्यानंतर स्कॉटिश बचाव पथकाने या दोघांच्या शोधासाठी बोटी रवाना केल्या. बरीच शोधाशोध केल्यानंतर या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले, असे स्कॉटलंड पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
हे दोघेही धबधब्यामध्ये कसे पडले, हे शोधून काढण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत तरी संशयास्पद वाटावे असे काहीही हाती लागलेले नाही, असे प्रवक्त्याने सांगितले.
आंध्र प्रदेशातील दोन विद्यार्थी धबधब्यामध्य पडून मरण पावल्याच्या वृत्ताला लंडनमधील भारतीय दूतावासाने दुजोरा दिला आहे. या संदर्भातील अधिक तपशील एडिनबर्गमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाकडून गोळा केला जातो आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात परत पाठवण्याची व्यवस्था डंडी युनिव्हर्सिटी विद्यापिठाकडून केली जाणार असल्याचे भारतीय उच्चायुक्तालयाने म्हटले आहे.