ब्रुसेल्स: युरोपियन संघातील प्रतिनिधींनी तब्बल् 1.52 लाख कोटी युरो (2.1 लाख कोटी डॉलर) इतका प्रचंड निधी करोना विषाणूच्या साथीतून बरे होण्याच्या उपाय योजनांसाठी मंजूर केला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या निधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
अंदाजपत्रक आणि कोविड निधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून युरोपियन संघाच्या प्रतिनिधींमध्ये अव्याहतपणे चर्चा सुरू होती. युरोपिय संघाच्या आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या सर्वात मोठ्या मंदीच्या काळात एवढी प्रदीर्घ चर्चा कधीच झाली नव्हती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
750 अब्ज युरोच्या कोविड निधीच्या बाबत प्रतिनिधींमध्ये एकमत झाले. हा निधी कर्ज आणि अनुदान स्वरुपात युरोपिय संघाच्या सदस्य देशांमध्ये वितरीत केला जाणार आहे. यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव सर्वाधिक असलेल्या देशांना प्राधान्य असणार आहे. युरोपियन संघाच्या 7 वर्षातील 1 लाख कोटी युरोच्या अंदाजपत्रकातील ही सर्वात मोठी तरतूद असणार आहे. तर अनुदानाची रक्कम 500 अब्ज युरोवरून 390 युरोपर्यंत कमी करण्यात आली.
चर्चेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी सांगितले. तर असामान्य परिस्थितीसाठी असामान्य प्रयत्नांची गरज असते असे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल म्हणाल्या.
नेदरलॅन्ड, ऑस्ट्रीया, फिनलंड, स्वीडन आणि डेन्मार्क आदी देशांनी गरजवंत देशांसाठीच्या मदतीच्या व्यवस्थेसाठी खर्चांना मर्यादा आणि कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीच्या हमीवर विशेष आग्रह धरला होता. आरोग्याच्या संकटाचा धोका कायम असल्याने महत्वाकांक्षी योजना अवलंबणे आवश्यक आहे, असा आग्रह स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सान्चेज यांनी धरला.