नवी दिल्ली – हरियाणामध्ये विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू झाला आहे. (poisonous liquor in Haryana) याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. यामध्ये कॉंग्रेस (Congress) नेत्याचा मुलगा आणि जननायक जनता पार्टी नेत्याचाही समावेश आहे. यमुनानगर आणि लगतच्या अंबाला जिल्ह्यातील मांडेबारी, पणजेतो का माजरा, फुसगढ आणि सारण या गावांमध्ये बनावट दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांमध्ये एका 71 वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना अटक केली असून इतरांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. मात्र, जीवाच्या भीतीने गावकरी या दारू व्यावसायिकांविरुद्ध उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत.
आम्ही आवाज उठवला तर आमचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती एका गावकऱ्याने व्यक्त केली आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशातील दोन स्थलांतरित मजुरांचाही गुरुवारी अंबाला येथे संशयास्पदरित्या विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला.
विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्यूंबाबतही राजकारण सुरू झाले आहे. या मृत्यूवरून विरोधी पक्षांनी मनोहर लाल खट्टर सरकारवर टीका केली आहे. याआधीच्या अशाच घटनांवरून हरियाणा सरकार धडा घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.