- लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाई
कार्ला – “लॉकडाऊन’मध्ये सरकारी आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर पडून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या 19 जणांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मोहीम लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू केली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारत देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहेत. राज्य, जिल्हा आणि शहरांच्या देखील सीमा सील करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्या यंत्रणा सुरू आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहायक निरीक्षक निरंजन रनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कुसगाव, वरसोली, कार्ला, पवनानगर परिसरात विनाकारण फिरणाऱ्या एकोणीस जणांवर गुन्हे दाखल केले असून, एक चारचाकी, तर अठरा दुचाकी वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून वेळोवेळी संचारबंदीचे उल्लंघन करू नका असे सांगून देखील काही महाभाग कोणते ना कोणते कारण करुन बाहेर पडतात. अशावर ही कारवाई केली आहे.
तरी सर्व नागरिकांनी खबरदारीसाठी घरातच राहावे सार्वजनिक संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर पडू नये. जर कोणी यापुढे देखील अशाप्रकारे संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे ही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.