सोशल मीडियामुळे महसूल विभागाकडून सामाजिक बांधिलकी
थेऊर- “महसूलचे शासकीय काम आणि सहा महिने थांब’ असा अनुभव सर्वसामान्यांना सरकारी कामांबाबत असतो. मात्र, हवेलीचे तहसीलदार व प्रांताधिकारी यांना माहिती समजताच फक्त वीस मिनिटांत विधवा महिलेच्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंची मदत घरपोच मिळाल्याचा प्रत्यय नागरिकांना आला. दोन दिवस उपासमार झाल्यानंतर पंढरीचा पांडुरंग साक्षात मदत घेऊन माझ्या घरी आल्याची प्रतिक्रिया यावेळी संबंधित महिलेनी दिली. ही लाखमोलाची मदत मिळाल्यानंतर तिने अश्रूंना मोकळी वाट करून दिली. आणि साक्षात पांडुरंग दारी आल्याची प्रचिती महिलेला आली.
जेमतेम महिनाभरापूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर तीन अल्पवयीन मुलांसह संबंधित महिला साडेसतरानळी (ता. हवेली) येथील दांगट वस्तीमध्ये मोलमजुरी करते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मोलमजुरी बंद असल्याने संबंधित महिलेला लॉकडाऊनच्या परिस्थितीत भीक मागत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागला, परंतु करोना संसर्ग रोगाच्या भीतीने व सर्वांच्याच सुरक्षिततेसाठी तिने घरीच थांबण्याचा निर्णय घेतल्याने संबंधित कुटुंबाची उपासमार होऊ लागली. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने कोणीतरी संबंधित कुंटुबास मदत करा. अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर व व्हॉटस्ऍपवर व्हायरल झाला. याबाबत पुणे जिल्ह्यातील अनेकांनी व्हॉटस्ऍपवर याविषयी माहिती देऊन मदत करण्याकामी विनंती केली. या माहितीच्या आधारे काहींनी प्रांताधिकारी सचिन बारवकर व तहसीलदार सुनील कोळी यांना फोनवरून संबंधित प्रकार कळवण्यात आला. त्यांनीही ताबडतोब मदतीचे आश्वासन दिले.
प्रांताधिकारी व तहसीलदार यांना फोन झाल्यानंतर फक्त वीस मिनिटांतच मंडल अधिकारी व्यंकटेश चिरुमुल्ला, तलाठी राजेश दिवटे यांनी संबंधित महिलेच्या घरी आठवडाभर पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा सुर्पुत केला. या मिळालेल्या मदतीने अंचबित झालेल्या विधवा महिलेच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याने तिने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. दोन दिवसांच्या उपासमारीनंतर पंढरीचा पांडुरंग साक्षात मदत घेऊन माझ्या घरी आल्याची भावना यावेळी संबंधित विधवा महिलेनी व्यक्त केली.