पुणे {प्रभात वृत्तसेवा} – आरटीओने जाहीर केलेल्या दराची अंमलबजावणी कॅब कंपन्यांकडून होत नसल्यामुळे कॅब चालकांकडून 20 फेब्रुवारीला बंद पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) ओला व उबेर कंपन्यांची बैठक बोलावून जाहीर केलेले नवीन दर लागू करण्यासंदर्भात त्यांना लेखी सूचना दिल्या आहेत.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने एसी कॅबसाठी नवीन दर निश्चित केले आहेत. त्या दराच्या आधारे ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी दर लागू करावे, अशा सूचना कंपन्यांना करण्यात आल्या होत्या. मात्र, कंपन्यांकडून नवीन दर लागू करण्यात वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत सर्व कॅब चालक यांनी २० फेब्रुवारी रोजी संगमवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) समोर काम बंद आंदोलन करणार असल्याचे ॅड. केशव क्षीरसागर यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभुमीवर आरटीओने ओला, उबेरसह ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांची बैठक घेतली.
या वेळी कंपन्यांनी त्यांची भूमिका आरटीओसमोर मांडली आहे. राज्याची ऍग्रीगेटर पॉलिसी अद्याप प्रलंबित आहे. सध्या केंद्र शासनाच्या ऍग्रीगेटर पॉलिसीनुसार दर लागू केलेले आहेत. त्यानुसार गर्दी नसते, त्यावेळी दरामध्ये ५० टक्क्यांपर्यंत कपात केली जाते, तसेच गर्दीच्या वेळी ५० टक्क्यांपर्यंत दर वाढविले जातात, असे सांगितले आहे. त्यानुसार आरटीओने या कंपन्यांना गर्दीच्या वेळेला असणारे प्रवासी व कमी गर्दीच्या वेळेला असणारे प्रवासी याची माहिती सादर करण्यास सांगितले आहे, तसेच नवीन दर लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. र्क