तहसीलदार रमा जोशी : 103 कोनशीला झाकल्या
मंचर – आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात शनिवारी (दि. 21) दुपारपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर रविवार (दि. 22) पर्यंत 150 फ्लेक्स तर 103 कोलशीला झाकल्या असल्याची माहिती आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
यावेळी नायब तहसीलदार अनिल गायकवाड, एल. सी. वाजे, रोहन डावरे उपस्थित होते. तहसीलदार जोशी म्हणाल्या की, शासकीय कार्यालये, रस्ते, एमएसईबीचे पोल, खासगी इमारतीवर लावलेले राजकीय पक्षांचे बोर्ड काढण्याच्या सूचना ग्रासेवक, तलाठी, सरपंच यांना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएम मशीन संदर्भात मतदारांच्या असलेल्या तक्रारी, शंकानिरसन व्हावे यासाठी मशिनचे डेमो ठेवलेले आहेत.
आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आठ भरारी पथके तयार करण्यात आली असून यापैकी चार पथके दिवसा तर चार पथके रात्री गस्त घालणार आहेत. एसएसटीची पाच पथके नेमण्यात आली असून यापैकी तीन पथके आंबेगाव तर दोन पथके शिरुर तालुक्यात असणार आहेत.
आचारसंहिता जाहीर झाल्यावर आंबेगाव-शिरुर विधानसभा निवडणुकीच्या कामांना वेग आला आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी भरारी पथके आणि एसएसटीची पथके नेमण्यात आली आहेत.
आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 82 हजार 832 मतदार आहेत. 336 मतदान केंद्र असून यापैकी आंबेगाव तालुक्यात 142 तर शिरुर तालुक्यात 39 मतदान केंद्र आहेत. निवडणूक शांततेत आणि व्यवस्थित पार पडण्यासाठी आचार संहितेचे काटेकोर पालन केले जाईल, अशी माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.