भारताच्या ऊर्जा सुरक्षेची आवश्‍यकता पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध

सौदी अरेबियाचे भारताला आश्‍वासन

नवी दिल्ली : सौदी अरेबियामध्ये जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर कंपनीत भीषण आगदेखील लागली होती. दरम्यान, या हल्ल्यामुळे जगात तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होताना पहायला मिळत आहे. याच पार्श्‍वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षेची आवश्‍यकता पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे आश्‍वासन सौदी अरेबियाने भारताला दिले आहे. तसेच बाजारातील स्थिरता राखण्यासाठी अन्य तेल उत्पादकांसह विधायकपणे काम करणार असल्याचेही सौदी अरेबियाने म्हटले आहे.

सौदी अरेबियाचे राजदूत डॉ. सौद बिन मोहम्मद अल सती यांनी याविषयी माहिती दिली. तसेच सौदीत झालेल्या या हल्ल्याची कसून चौकशी करण्यासाठी यूएन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार असल्याचेही सती यांनी यावेळी म्हटले. तसेच आपला देश भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सौदी अरेबियामध्ये स्वतःचा बचाव करण्याची क्षमता असून या हल्ल्यांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याची क्षमता असल्याचा विश्‍वासदेखील यावेळी राजदूतांनी व्यक्‍त केला. सौदी अरेबियन नॅशनल पेट्रोलियम कंपनी सौदी अरामकोवर 14 सप्टेंबर रोजी ड्रोन हल्ला करण्यात आला होता त्यामुळे कंपनीकडून तेलउत्पादन थांबवण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.