पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढत आहे. यास आळा घालण्यासाठी पशूवैद्यकीय विभागाने स्वतंत्र हेल्पलाइन नंबर देऊ केला आहे. आतापर्यंत या माध्यमातून 150 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
मोकाट जनावरांमुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, यासाठी महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत आहे. शहरातील 8 झोन मधील नेमकी आणि महत्वाची माहिती, समस्या त्वरीत पशू वैद्यकीय विभागाला कळाव्यात आणि त्यावर लगेच कारवाई केली जावी यासाठी विभगाचा स्वत:चा हेल्पलाइन नंबर ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला आहे. पशूवैद्यकीय विभागाने नव्याने सुरु केलेल्या 8856874747 या हेल्पलाइन नंबरवर शहरातील विविध भागातून समस्याचे कॉल येत आहेत.
त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी दोन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. समस्या कुठल्या प्रभागातील आणि कशा प्रकारची आहे. याबाबत माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना दिली जाते. त्यानुसार कारवाई केली जात असल्याचे पशूवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
काही समस्या महापालिकेच्या सारथी या संकेतस्थळावर येतात. तेथील आणि हेल्पलाइन नंबरवरील समस्या सोडवण्यात येत आहे. यामुळे नेमकी समस्या काय आणि काय तयारीने संबधित भागात जायचे याबाबत स्पष्ट माहिती कर्मचाऱ्यांना मिळत आहे.
आतापर्यंत या हेल्पलाइन नंबरवरुन 150 जणांच्या समस्या सोडवण्यात आल्या आहे. ही संकल्पना पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी राबवली असून येत्या काळात शहरवासीयांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात येईल, असे डॉ. दगडे यांनी सांगितले आहे.