पुणे – पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीची सर्व तयारी वेळेत पूर्ण करा. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मतदान दिवशी मतदान केंद्र वेळोवेळी निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
रांगेत सामाजिक अंतर असावे, हॅंडवॉश, सॅनिटायझर व्यवस्था करावी. तसेच बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी घ्या. बोगस मतदार असल्याचे निष्पन्न झाल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा, असा विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.
राव यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून सोमवारी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.
राव म्हणाले, “पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सर्वांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. मतदानासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे प्रशिक्षण तात्काळ पूर्ण करा. निवडणूकीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडा’.