बीजिंग – चीनमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला, तर ४४ जण जखमी झाले आहेत. चीनच्या पूर्वेकडील जियांग्सू प्रांताची राजधानी असलेल्या नानजिंग शहरामध्ये शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
प्राथमिक तपासणीनुसार ही आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. येथे इलेक्ट्रीक सायकली ठेवलेल्या होत्या. महिन्याभरात चीनमध्ये झालेली ही दुसरी मोठी आगीची दुर्घटना आहे.
महिन्याभरापूर्वी अशाच एका दुर्घटनेमध्ये ३९ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर २० जानेवारीला हेनान प्रांतातील निवासी शाळेला लागलेल्या आगीमध्ये १३ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. हे सर्व विद्यार्थी इयत्ता तिसरीमध्ये शिकणारे होते.
तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शांक्सी प्रांतात लुलियांग शहरातील एका कार्यालयाच्या इमारतीला लागलेल्या आगीत २६ जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार घडणार्या आगीच्या घटनांंना आळा घालण्याचे आदेश अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत.